नाशिकमधील अशोक खरात प्रकरण अधिकच गंभीर होत चालले असून, आता या प्रकरणात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी माजी आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर थेट आरोप करत, त्यांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.
देसाई यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी हे प्रकरण समोर येत असताना एका वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी श्रीरामपूर पोलीस स्टेशनला फोन करून खरातला मदत करण्याचा प्रयत्न झाला, असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी सोशल मीडियावर कराळे यांचा ईशान्येश्वर मंदिरातील गुरुपौर्णिमा कार्यक्रमातील फोटो शेअर केल्याचेही सांगितले.
याशिवाय, काही महत्त्वाचे पुरावे विशेषतः पेन ड्राईव्ह मागील वर्षी मिळणार होते, मात्र पोलिसांच्या दबावामुळे ते समोर आले नाहीत, असेही देसाई यांनी नमूद केले. “जर आयजी स्वतः खरातला गुरु मानत असतील, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होणं स्वाभाविक आहे,” असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे कराळे यांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे. देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका करत, त्यांना खरातच्या कृत्यांची माहिती असूनही त्यांनी त्याला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आणि त्यांच्या चौकशीची मागणी केली.
दरम्यान, ५ मार्च रोजी नगर आणि नाशिक येथील काही नागरिकांनी पेनड्राईव्ह देसाई यांच्याकडे दिले. त्यांनी संबंधितांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिल्यानंतर हे लोक नगरच्या एसपींना भेटले. त्यानंतर अतिरिक्त एसपीमार्फत हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आणि त्यानंतरच पहाटेच्या सुमारास खरातला ताब्यात घेण्यात आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.




