धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी उड्डाणे रोखली; प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी नवे वेळापत्रक तपासून घेण्याचे आवाहन
जर तुम्ही येत्या काही महिन्यांत विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतातील चार प्रमुख विमानतळांवरील धावपट्टीच्या (Runway) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे काही काळासाठी ही विमानतळं तात्पुरती बंद ठेवली जाणार आहेत. यामध्ये पुणे, जोधपूर, श्रीनगर आणि आदमपूर एअर बेस यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही विमानतळं सीमाभागात आणि लष्करीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असल्याने, तिथे फायटर जेट्सच्या उड्डाणासाठी धावपट्टी सुस्थितीत असणे अनिवार्य असते. म्हणूनच सुरक्षेच्या कारणास्तव ही डागडुजी केली जाणार आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार, जोधपूर विमानतळ २९ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत पूर्णपणे बंद असेल, ज्यासाठी विमान कंपन्यांनी आधीच बुकिंग थांबवले आहे. श्रीनगर विमानतळ १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान बंद राहणार असून, ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान केवळ शनिवार-रविवार उड्डाणे सुरू राहतील. पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीची घोषणा झाली असली तरी त्याची नेमकी तारीख अद्याप निश्चित व्हायची आहे. तसेच, आदमपूर एअर बेस वर्षाच्या शेवटी तब्बल आठ महिन्यांसाठी बंद राहण्याची शक्यता आहे. या काळात विमानांचे मार्ग बदलले जाऊ शकतात किंवा उड्डाणांना विलंब होऊ शकतो, त्यामुळे प्रवाशांनी आपले नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी.




