फक्त आहार-व्यायाम पुरेसा नाही; बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यास वेळीच औषधोपचार सुरू करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी’ आणि ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’ने कोलेस्टेरॉलबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. ८० ते ९० टक्के हृदयविकार हे वेळीच निदान आणि उपचार केल्यास टाळता येऊ शकतात, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवळ आहार आणि व्यायामावर अवलंबून न राहता, जर कोलेस्टेरॉलची पातळी मर्यादेबाहेर असेल, तर वयाच्या ३० व्या वर्षापासूनच औषधे सुरू करणे हिताचे ठरेल. शरीरातील ‘बॅड कोलेस्टेरॉल’ (LDL) जितके कमी असेल, तितके तुमचे हृदय अधिक सुरक्षित राहील, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
नव्या नियमांनुसार, प्रत्येक सुदृढ व्यक्तीने आपले LDL कोलेस्टेरॉल १०० mg/dL पेक्षा कमी ठेवणे आवश्यक आहे. ज्यांना आधीच हृदयविकार किंवा पक्षाघाताचा (Stroke) झटका येऊन गेला आहे, त्यांनी ही पातळी ५५ mg/dL च्या खाली राखणे गरजेचे आहे. विशेषतः ४० वर्षांवरील व्यक्ती, मधुमेही, उच्च रक्तदाबाचे रुग्ण आणि ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे, अशा लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. भारतात तरुण वयात हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याने, भारतीय तज्ज्ञांनीही या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
हृदय निरोगी राखण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम, ७ तासांची पुरेशी झोप, संतुलित आहार आणि धूम्रपानापासून दूर राहणे अनिवार्य आहे. तसेच, दर तीन महिन्यांनी ‘लिपिड प्रोफाइल’ चाचणी करून आपल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्ष ठेवणे हाच भविष्यातील गंभीर धोके टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मैदा आणि अति-तेलकट पदार्थांचा त्याग करून तरुण वयातच आरोग्याची शिस्त लावणे आता काळाची गरज बनली आहे.




