पिंपरी पेंढार हद्दीत स्विफ्ट आणि पिकअपची समोरासमोर धडक; पिकअप चालक फरार
ओतूर,प्रतिनिधी:दि.१८ मार्च [ रमेश तांबे ]
ओतूर: अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर बुधवारी पहाटेच्या सुमारास काळाने घाला घातला. पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत स्विफ्ट कार आणि पिकअप यांच्यात झालेल्या अत्यंत भीषण अपघातात ओतूर येथील एका ३४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत उर्फ मयूर नामदेव पानसरे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण ओतूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत हा बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास आपल्या स्विफ्ट कारने (MH 14 GY 2135) आळेफाट्याकडून ओतूरच्या दिशेने येत होता. याच वेळी ओतूरकडून आळेफाट्याकडे जाणाऱ्या पिकअपची (MH 14 HG 5686) आणि त्याच्या कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयानक होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. धडकेनंतर पिकअप रस्त्यावरच पलटी झाली, मात्र अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. दुर्दैवाने, कार चालक अनिकेतचा या अपघातात जागीच अंत झाला.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आणि पिंपरी पेंढारचे ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. ओतूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




