१० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; नेरुळ, खारघरसह पाच पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची उकल
विजय गायकवाड – नवी मुंबई
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दुचाकी आणि रिक्षा चोरीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नेरुळ पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीचा छडा लावला आहे. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाचे जाळे विणत पोलिसांनी इम्रान शफीक शेख (१८) आणि सूरजकुमार राजन प्रसाद (२८) या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून १० लाख रुपये किमतीच्या ११ मोटारसायकली आणि ५ रिक्षा असा एकूण १६ वाहनांचा साठा जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या आदेशानुसार, नेरुळ पोलिसांच्या विशेष पथकाने ही मोहीम फत्ते केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून नवी मुंबईतील नेरुळ, खारघर, कामोठे, कळंबोली आणि तळोजा या पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नोंद असलेल्या १६ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या टोळीसोबत असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते, मात्र कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ पोलिसांनी अत्यंत शिताफीने या चोरांच्या मुसक्या आवळल्या असून, या टोळीचा आणखी काही गुन्ह्यांत सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या यशामुळे नवी मुंबईतील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.




