सोनं १४५० तर चांदी ४००० रुपयांनी स्वस्त; जागतिक बाजारपेठेतील कमकुवतपणाचा देशांतर्गत बाजारावर परिणाम
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारातून सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. जागतिक बाजारपेठेतील पडझड आणि कमोडिटी एक्सचेंजमधील मंदीमुळे देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमती दणदणीत आपटल्या आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १४५० रुपयांची कपात झाली असून, आता सोन्याचा भाव १,५७,६३० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या किमतीतही मोठी घसरण पाहायला मिळाली असून, चांदी ४००० रुपयांनी स्वस्त होऊन २,५५,७१० रुपये प्रति किलो झाली आहे. एमसीएक्स (MCX) वर देखील सोन्याचा भाव ०.९६ टक्क्यांनी, तर चांदीचा भाव १.६० टक्क्यांनी खाली आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही मौल्यवान धातूंमध्ये नरमाई दिसून येत आहे. अमेरिकेच्या कॉमेक्स बाजारात सोन्याचा व्यवहार ५०१३ डॉलर प्रति औंसच्या आसपास सुरू असून चांदी ८० डॉलरवर स्थिरावली आहे. या घसरणीमुळे आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४४,४९४ रुपयांवर आला आहे. जरी आज बाजारात किमती कमी झाल्या असल्या, तरी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता सोने आणि चांदीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत ७८ टक्के, तर चांदीच्या किमतीत तब्बल १५३ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
बाजार तज्ज्ञांच्या मते, सध्याची ही घसरण जागतिक घडामोडींचा परिणाम असून अल्पकाळासाठी खरेदीदारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत असले तरी, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही या धातूंवर लोकांचा विश्वास कायम आहे. लग्नसराईच्या काळात झालेली ही दरातील घट मध्यमवर्गीय कुटुंबांना काहीसा आर्थिक दिलासा देणारी ठरणार आहे.




