spot_img

US-Iran War 2026 : होर्मुजच्या खाडीत अमेरिका एकाकी? ट्रम्प यांच्या मदतीच्या आवाहनाला बड्या राष्ट्रांचा ‘खो’

spot_img

इंधन टंचाईमुळे जगावर आर्थिक संकट, तर भारतासाठी मात्र ‘होर्मुज’चा मार्ग खुला.

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला १५ दिवस उलटले असून, हे रणकंदन आता जागतिक स्तरावर गंभीर वळण घेत आहे. इराणवर सातत्याने होत असलेल्या मोठ्या हल्ल्यांना इराणने धैर्याने प्रत्युत्तर दिले असून, “शेवटपर्यंत लढू” असा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, या युद्धाचा सर्वात मोठा फटका जागतिक तेल पुरवठ्याला बसला आहे. इराणने सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला ‘होर्मुजचा समुद्रमार्ग’ बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असून अनेक देशांसमोर इंधन टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि इराणवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान, फ्रान्स, चीन, ब्रिटन आणि दक्षिण कोरिया यांसारख्या मित्रराष्ट्रांकडे लष्करी मदतीची मागणी केली होती. “हे देश आपल्या युद्धनौका होर्मुजच्या खाडीत पाठवतील आणि अमेरिकेला सहकार्य करतील,” असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र उलटे दिसत आहे. एकामागून एक सर्वच बड्या राष्ट्रांनी या युद्धात उडी घेण्यास नकार दिला असून, ट्रम्प यांना हा मोठा राजनैतिक धक्का मानला जात आहे.

फ्रान्सने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, त्यांच्या युद्धनौका होर्मुजच्या खाडीत जाणार नाहीत. विशेष म्हणजे, ज्या चीनकडून अमेरिकेला मोठी अपेक्षा होती, त्यांनीही मदतीचा हात झटकला आहे. ब्रिटननेही या संघर्षात पडण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, इराण या भागात अत्यंत आक्रमक असून शत्रू राष्ट्रांची जहाजे पेटवून दिली जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, इराणने हा मार्ग केवळ निवडक देशांसाठीच सुरू ठेवला असून, त्यात भारताच्या जहाजांना प्रवेश दिला जात आहे. मित्रराष्ट्रांनी पाठ फिरवल्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका या पेचातून कसा मार्ग काढतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ