जागतिक राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे फक्त युद्धजन्य परिस्थितीच निर्माण झाली नाही, तर त्याचा मोठा फटका भारतीय रुपयाला बसला आहे. भारतीय रुपयाने आजवरचा ‘ऐतिहासिक नीचांक’ गाठला आहे. एका डॉलरची किंमत आता 92.35 रुपयांच्या पार गेली आहे. शेअर बाजार कोसळत आहे, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत आणि अशातच सर्वसामान्यांच्या मनात एकच धास्ती आहे – आता महागाई किती वाढणार?
इराण-अमेरिका युद्धामुळे भारतातली परिस्थिती किती गंभीर आहे हे आकडेवारीवरून लक्षात येईल. बुधवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 92.01 वर बंद झाला होता. पण गुरुवारी बाजार उघडताच तो थेट 92.25 वर आला आणि पाहता पाहता त्याने 92.35 चा स्तर गाठला. यापूर्वीचा 92.34 चा रेकॉर्डही मोडीत निघाला आहे. केवळ रुपयाच नाही, तर जगातील प्रमुख 6 चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा ‘डॉलर इंडेक्स’ सुद्धा 0.24 टक्क्यांनी वधारून 99.47 वर पोहोचला आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा विकसनशील देशांची चलने, जसे की आपला रुपया, कमकुवत होतात.
आता प्रश्न पडतो की, युद्ध तिकडे होतंय मग रुपया इथे का घसरतोय? याचे मुख्य कारण आहे ‘कच्चे तेल’ Crude Oil. पश्चिम आशियात तणाव वाढल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर आता 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, इराणने जगाला इशारा दिला आहे की, परिस्थिती सुधारली नाही तर तेलाचे दर 200 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात! भारत आपल्या गरजेच्या 60 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा भारताला ते विकत घेण्यासाठी जास्त डॉलर्स द्यावे लागतात. यामुळे देशाची ‘व्यापार तूट’ Trade Deficit वाढते आणि परिणामी रुपयाच्या मूल्यावर प्रचंड दबाव येतो.
या युद्धामुळे केवळ तेलच नाही, तर शेअर बाजारानेही रुपयाची साथ सोडली आहे. युद्धामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आपला पैसा काढून घेत आहेत. जेव्हा हे गुंतवणूकदार शेअर्स विकतात, तेव्हा ते मिळालेले रुपये डॉलर्समध्ये रूपांतरित करून मायदेशी नेतात. बाजारात रुपयाची विक्री वाढली की त्याचे मूल्य आपोआप कमी होते.
रुपयाची ही घसरण रोखण्यासाठी भारताची मध्यवर्ती बँक, म्हणजेच RBI मैदानात उतरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रुपया 92.35 च्या खाली जाऊ नये म्हणून RBI ने डॉलर्सची विक्री सुरू केली आहे. जेव्हा बाजारात डॉलरची टंचाई निर्माण होते, तेव्हा RBI आपल्या परकीय चलन साठ्यातून Forex Reserve मधून डॉलर्स बाजारात सोडते, जेणेकरून रुपयाला आधार मिळेल. मात्र, युद्ध प्रदीर्घ काळ चालले तर RBI ला देखील मर्यादा येऊ शकतात.
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा – याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? सर्वात आधी तर महागाईचा भडका होणार. कच्चे तेल महागले की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात. वाहतूक खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, दूध आणि अन्नधान्य महाग होते. आपण मोबाईल, लॅपटॉप आणि अनेक इलेक्ट्रॉनिक सुटे भाग आयात करतो. रुपया कमकुवत झाल्यामुळे या वस्तूंच्या किमती 5 ते 10 टक्क्यांनी वाढू शकतात. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी परदेशात शिकत असेल, तर आता तुम्हाला फी भरण्यासाठी जास्त रुपये मोजावे लागतील. तसेच परदेशवारी आता महाग होणार आहे. आधीच गॅसचे दर वाढलेले असताना, रुपयाच्या घसरणीमुळे गॅस कंपन्यांवर दबाव येईल आणि पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
थोडक्यात सांगायचे तर, पश्चिम आशियातील हे युद्ध केवळ Geo-Political मुद्दा राहिलेला नाही, तर तो आपल्या घराच्या बजेटचा प्रश्न बनला आहे. जर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळला नाही, तर रुपया 100 च्या पातळीकडेही जाऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारताला आता आत्मनिर्भर होण्यासोबतच पर्यायी इंधनावर भर देण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. रुपयाची ही घसरण सरकार रोखू शकेल का? की आपल्याला आणखी महागाईला सामोरे जावे लागेल? यावर देखील आता राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.




