spot_img

Inflation : फेब्रुवारीत किरकोळ महागाईत वाढ; दर 3.21 टक्क्यांवर पोहोचला

spot_img

जानेवारीपेक्षा 47 बेसिस पॉईंटची वाढ; काही भाज्यांचे दर घसरले तर दागिन्यांच्या किमतीत मोठी उसळी.

भारतामध्ये फेब्रुवारी 2026 महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढून 3.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. जानेवारी महिन्यात हा दर 2.74 टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील महागाईत काही प्रमाणात फरक दिसून आला आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 3.37 टक्के नोंदवला गेला असून शहरी भागात तो 3.02 टक्के आहे.

खाद्यपदार्थांच्या किमतींचा अंदाज दर्शवणाऱ्या कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्सनुसार फेब्रुवारी महिन्यात अन्नपदार्थांची महागाई 3.47 टक्के राहिली. ग्रामीण भागात हा दर 3.46 टक्के तर शहरी भागात 3.48 टक्के इतका नोंदवला गेला.

दरम्यान, काही भाज्यांच्या किमतींमध्ये घसरण झाल्याचेही आकडेवारीत दिसून आले आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत टोमॅटो, वाटाणा आणि कोबी यांच्या किंमतीत सुमारे 10 टक्क्यांची घट झाली. तसेच लसूण, कांदा आणि बटाटा यांच्या दरातही वर्षभराच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. लसणाचे दर वार्षिक आधारावर 31.09 टक्क्यांनी, कांद्याचे दर 28.20 टक्क्यांनी तर बटाट्याचे दर 18.46 टक्क्यांनी कमी झाले.

मात्र दुसरीकडे काही वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत सर्वाधिक वाढ दिसून आली असून त्या वार्षिक आधारावर 160.84 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोने, हिरे आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या किमतीत 48.16 टक्क्यांची वाढ झाली. तसेच खोबरे, टोमॅटो आणि फ्लॉवरच्या दरातही अनुक्रमे 46.16 टक्के, 45.29 टक्के आणि 43.77 टक्क्यांची वाढ झाली.

सीपीआय अंतर्गत विविध क्षेत्रांतील महागाईचेही आकडे जाहीर करण्यात आले. फूड अँड बेव्हरेजेस गटात महागाई 3.35 टक्के, तंबाखूजन्य पदार्थांमध्ये 3.49 टक्के, कपडे व पादत्राणे या गटात 2.81 टक्के महागाई नोंदवली गेली. घरभाडे, पाणी, वीज, गॅस व इंधन यासारख्या सेवांमध्ये 1.52 टक्क्यांची वाढ झाली. तर वाहतूक क्षेत्रातील महागाई काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. शिक्षण सेवांमध्ये 3.33 टक्के तर रेस्टॉरंट आणि हॉटेल सेवांमध्ये 2.73 टक्के महागाई राहिली.

सरकारच्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2026 मधील हे आकडे तात्पुरते असून मार्च 2026 महिन्याची महागाईची अधिकृत आकडेवारी 13 एप्रिल 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ