कौटुंबिक वाद उघडकीस आल्यानंतर प्रकरण चिघळले; सोशल मीडियावर व्हिडीओनंतर घडला कार अपघात.
लोकप्रिय यूट्यूबर अनुराग डोभाल गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आणि कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याचा भीषण कार अपघात झाल्याने तो सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर लाईव्ह करत असताना कार चालविताना त्याचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती मिळत आहे.
या घटनेदरम्यान आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. अनुरागचे वडील जगदंबा प्रसाद डोभाल यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला संपत्तीमधून बेदखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी देहरादूनमधील एका वृत्तपत्रामध्ये अधिकृत नोटीस प्रसिद्ध केली आहे. या नोटीसमध्ये मुलगा अनुराग डोभाल आणि सून रितिका डोभाल यांचे नाव कौटुंबिक संपत्तीमधून काढून टाकल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नोटीसमध्ये पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, भविष्यात अनुराग किंवा त्याच्या पत्नीशी संबंधित कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा देणंघेण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच असेल आणि त्याचा डोभाल कुटुंबाशी कोणताही संबंध राहणार नाही. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनुरागने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. त्याने सांगितले की त्याचे इंटरकास्ट लग्न झाल्यामुळे कुटुंब नाराज आहे आणि त्याच्या लग्नालाही कुटुंबातील सदस्य उपस्थित नव्हते. तसेच कुटुंबीय आपल्याकडून पैसे घेत असल्याचाही आरोप त्याने केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने, “माझ्याबाबत काही घडले तर त्याला माझे आई-वडील आणि भाऊ जबाबदार असतील,” असेही म्हटले होते.
यानंतर शनिवारी रात्री तो इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन कार चालवत असताना त्याच्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.




