९ मार्चच्या मध्यरात्री ५ नराधमांचा थरार; मदतीला आलेल्या दुचाकीस्वारालाही बेदम मारहाण
कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ९ मार्चच्या मध्यरात्री आपल्या २९ वर्षीय गतिमंद भावासोबत बिर्याणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या २१ वर्षीय तरुणीवर पाच नराधमांनी जीवघेणा हल्ला करत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडित बहीण-भाऊ स्कूटरवरून जात असताना रिक्षामधून आलेल्या आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि निर्जनस्थळी गाठून भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. आपल्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणीला केसाला धरून ओढत नेत आरोपींनी तिचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि पोलिसांची भीती दाखवत तिला धमकावले.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांची भूमिका. पीडित तरुणीने प्रसंगावधान राखून आईला लोकेशन पाठवल्यानंतर आरोपींनी स्वतःच पोलिसांना पाचारण केले. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नराधमांवर कारवाई करण्याऐवजी उलट पीडित बहीण-भावालाच “इतक्या रात्री बाहेर का फिरता?” असे विचारत तिथून हाकलून दिले. पोलिसांच्या या असंवेदनशील वागणुकीमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे चित्र दिसत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तरुणीने घरी जाऊन आपबिती सांगितल्यानंतर नातेवाईकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन जाब विचारला, तेव्हा कुठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी नितीन बिरादार आणि अभिषेक सोनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून सोहेल तांबोळी, बाबू आणि एका रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कर्तव्यात कसुरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी होत आहे.




