इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी हेड कोच गंभीरलाही सुचवला मोठा बदल
टी-२० क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज मानला जाणारा अभिषेक शर्मा सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. चालू टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याच्या बॅटला जणू गंज चढला असून, सहा सामन्यांत त्याला केवळ ८० धावा करता आल्या आहेत. सुपर-८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध केलेल्या एका अर्धशतकाचा अपवाद वगळता, पाकिस्तान, अमेरिका आणि नेदरलँड्स विरुद्ध तो चक्क शून्यावर बाद झाला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यातही केवळ १० धावांवर माघारी परतल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. वारंवार फिरकी गोलंदाजांपुढे नांग्या टाकणारा अभिषेक आता सेमीफायनलच्या संघात राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अभिषेकच्या या खराब फॉर्मवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. ५ मार्च रोजी वानखेडेवर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या महामुकाबल्याआधी पाँटिंग म्हणाला, “जेव्हा धावा येत नसतात, तेव्हा दरवेळी नेट्समध्ये जाऊन तासनतास सराव करणे गरजेचे नसते. अशा वेळी मानसिकदृष्ट्या रिफ्रेश होण्यासाठी क्रिकेटपासून थोडा वेळ लांब राहणे किंवा सुट्टी घेणे केव्हाही चांगले.” कौशल्य कधीच नष्ट होत नाही, फक्त दबावामुळे कामगिरी खालावते, असेही त्याने नमूद केले.
पाँटिंगने हेड कोच गौतम गंभीर यांना एक धाडसी पर्यायही सुचवला आहे. अभिषेकचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड चांगला असला आणि त्याने याच वानखेडेवर शतक झळकावले असले, तरी त्याचा सध्याचा आत्मविश्वास डळमळीत आहे. अशा वेळी पाँटिंगच्या मते, संघ व्यवस्थापनाने अभिषेकला विश्रांती देऊन रिंकू सिंहला संघात स्थान द्यावे. “अभिषेक मॅच विनर आहेच, पण जर त्याला बाहेर बसवून तुम्ही रिंकू सिंहला आणत असाल, तर तुम्ही एका मॅच विनरच्या जागी दुसऱ्या ताकदीच्या मॅच विनरलाच संघात संधी देत आहात,” असे पाँटिंगने स्पष्ट केले. आता महत्त्वाच्या सामन्यात गंभीर अभिषेकवर विश्वास दाखवतात की रिंकूवर डाव लावतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




