डाएट प्लॅनसाठी एआयवर अवलंबून राहणे पडू शकते महागात; तंत्रज्ञानाच्या मर्यादांकडे दुर्लक्ष नको
आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘AI’ आपल्या घराघरात आणि वैयक्तिक आयुष्यात पोहोचली आहे. ऑफिसची कामे असोत किंवा वजन कमी करण्याचा प्रवास, अनेकजण आता एआय टूल्सचा आधार घेत आहेत. कॅलरीज मोजणे, व्यायामाची आठवण करून देणे आणि तातडीने डाएट चार्ट तयार करणे यामुळे ही प्रक्रिया सोपी वाटत असली, तरी आरोग्याच्या बाबतीत एआयवर पूर्णपणे विसंबून राहणे ‘धोकादायक’ ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
एआय टूल्स जरी अत्यंत प्रगत असली, तरी ती प्रशिक्षित डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ (Dietitian) नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे शरीर, चयापचय शक्ती (Metabolism), अनुवंशशास्त्र आणि वैद्यकीय इतिहास वेगळा असतो. एआय सहसा उपलब्ध असलेल्या सर्वसाधारण डेटावर आधारित सल्ला देते. मात्र, एखाद्या व्यक्तीला थायरॉईड, पीसीओडी किंवा मधुमेहासारखे आजार असतील, तर एआयने दिलेला डाएट प्लॅन शरीरातील हार्मोनल असंतुलन वाढवू शकतो. यंत्राला तुमच्या शरीराच्या त्या सूक्ष्म गरजा समजत नाहीत, ज्या एका अनुभवी वैद्याला समजू शकतात.
याव्यतिरिक्त, जलद परिणामांसाठी एआय अनेकदा ‘क्रॅश डाएट’ किंवा अत्यंत कमी कॅलरीजचा आहार सुचवते. यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊन प्रचंड अशक्तपणा येऊ शकतो. सतत कॅलरीज ट्रॅक करणे आणि मशीनच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या दबावामुळे मानसिक ताण वाढून खाण्यापिण्याचे विकार (Eating Disorders) जडण्याची शक्यता असते. त्यामुळे तंत्रज्ञानाची मदत जरूर घ्यावी, पण आरोग्याशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणेच हिताचे ठरेल.




