मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला आहे. अणुकराराच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.
तेहरानमधील युनिव्हर्सिटी स्ट्रीट आणि जोमहोरी परिसरात अनेक क्षेपणास्त्रे कोसळल्याची माहिती आहे. शहराच्या मध्यवर्ती पाश्चर स्ट्रीट भागातून दाट धूर उठताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर तेहरानमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इस्रायलमध्ये सतर्कता; उड्डाणे स्थगित
हल्ल्यानंतर इस्रायलने तात्काळ आणीबाणी जाहीर केली. देशातील विविध भागांत सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थानांच्या जवळ राहण्याच्या सूचना मोबाईल अलर्टद्वारे देण्यात आल्या आहेत. संभाव्य प्रत्युत्तरात्मक हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत. IDFनेही नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, तेल अविवमधील सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द करण्यात आली आहेत.
हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद
इस्रायलच्या वाहतूक मंत्री मिरी रेगेव्ह यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरी विमानसेवांसाठी देशाचे हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत, पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांनी विमानतळांवर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच हवाई सेवा पुन्हा सुरू केली जाईल आणि त्याबाबत किमान 24 तास आधी अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कतारमधून सावधगिरीचा इशारा
दरम्यान, कतार मधील अमेरिकन दूतावासाने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील सुरक्षास्थिती अत्यंत नाजूक बनली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.




