वारकरी संप्रदायासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात आधीच वातावरण तापले असताना आळंदीत आज सकाळी मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे सकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
माहितीनुसार, हभप संग्राम भंडारे यांनी आपल्या समर्थकांसह लवांडे यांना घेरत त्यांच्यावर शाईफेक केली. वारकरी संप्रदायातील संत, गुरुवर्य आणि कीर्तन परंपरेविरोधात करण्यात आलेल्या कथित वक्तव्यांमुळे संतप्त झाल्याचे भंडारे यांनी सांगितले. “आमच्या परंपरेवर आणि गुरूंवर टीका सहन केली जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली.
काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात “कट्टर हिंदुत्ववादी आणि मनुवादी विचारांचे लोक शिरले आहेत” असा आरोप केला होता. तसेच काही कीर्तनकारांवरही त्यांनी गंभीर टीका केली होती. त्यांच्या या विधानामुळे धार्मिक संघटना आणि वारकरी समाजात मोठी नाराजी निर्माण झाली होती.
घटनेनंतर विकास लवांडे यांनी प्रतिक्रिया देताना, “माझ्यावर केवळ शाईफेक नाही तर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला,” असा गंभीर आरोप केला. या प्रकारानंतर आळंदी परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून संबंधितांकडून माहिती घेतली जात आहे. या घटनेमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे.




