पत्नीसह शेळकेंचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर; खरातचा एन्काऊंटर होणार? सुषमा अंधारेंच्या एका ट्विटने उडाली खळबळ!
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कडी मानले जाणारे जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी रस्त्यावरील धोत्रे गावाजवळ शेळके यांची कार उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरात धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून, जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवानिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि संचालक असलेले शेळके हे खरातचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. खरातचे प्रकरण उघडकीस आल्यापासून शेळके प्रचंड तणावात होते, अशी माहिती समोर येत आहे.
या अपघाताने आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अनेक शंकाकुशंकांना जन्म दिला आहे. हा केवळ अपघात आहे की यामागे काही ‘घातपात’ दडलेला आहे, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना नेत्री सुषमा अंधारे यांनी या संदर्भात एक सूचक ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे. “खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ही भीती अनेकदा वर्तवण्यात आली होती. आता शेळकेंचा असा अंत होणे, हे संशयाचे धुके अधिक गडद करणारे आहे,” असे अंधारे यांनी म्हटले आहे. खरातचे राजकीय आणि प्रशासकीय कनेक्शन पाहता, त्याच्याकडे अनेक बड्या नेत्यांची गुपिते दडलेली असू शकतात, त्यामुळे खरातचाही ‘एन्काऊंटर’ करून पुरावे नष्ट केले जातील का? अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
जितेंद्र शेळके हे केवळ सहकारी नव्हते, तर खरातच्या आर्थिक व्यवहारांमधील महत्त्वाची व्यक्ती होते. त्यांच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी होती. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचाच अपघाती मृत्यू झाल्याने तपासावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. “जर एसआयटी (SIT) तपासाची गती वाढवत नसेल आणि संबंधितांची चौकशी होत नसेल, तर लोकांचा यंत्रणांवरील विश्वास उडेल,” असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला आहे. हा अपघात होता की खरात प्रकरणातील सत्य दाबण्याचा प्रयत्न, हे आता सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल; परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे.




