महाराष्ट्रातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवत मतदारसंघावर आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला.
या विजयामुळे त्यांची आमदार म्हणून विधानसभेत एंट्री निश्चित झाली असून आता त्यांना विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यासाठी त्या दिल्लीला पोहोचल्या असून आज त्या उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. बारामती हा पवार कुटुंबाचा पारंपरिक गड मानला जातो. या मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा पवार कुटुंबावर विश्वास दाखवत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.




