Sanjay Raut : “जर सगळं प्रेमानेच जिंकता येतं, तर मग तो ‘५० कोटीं’चा प्रकार काय?” संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना सवाल

spot_img

विधान परिषद निवडणुकीत १५0 कोटींचा घोडेबाजार झाल्याचा राऊतांचा खळबळजनक आरोप; केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरून गृहमंत्र्यांवर डागली तोफ.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा ‘पैसा विरुद्ध प्रेम’ आणि ‘सत्तेचा गैरवापर’ या मुद्द्यावरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे. “माणसं पैशाने नाही तर प्रेमाने जिंकता येतात,” या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशांचा खेळ आणि घोडेबाजार झाला, हे सत्ताधाऱ्यांनी मान्य करावे, असे म्हणत संजय राऊत यांनी थेट ५० कोटी आणि १५० कोटींच्या कथित व्यवहारांचे आकडे जाहीर करून मोठी खळबळ उडवून दिली आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “जर सगळं काही प्रेमानेच जिंकता येतं, तर मग तो ५० कोटींचा प्रकार काय होता? केवळ तुमच्यासोबत सरकार स्थापन करण्यासाठी जे येत आहेत, त्यांच्यावरच हे ५० कोटींचं प्रेम कशासाठी? तुमच्याकडे इतकं प्रेम असेल, तर महाराष्ट्रातील लाखो गरिबांना पैशांची गरज आहे, हे ५० कोटी त्यांच्या घरात पोहोचवा, मग आम्ही समजू तुम्ही प्रेमाने जग जिंकताय.”
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आरोप करताना राऊत म्हणाले की, ज्या जागा सहज बिनविरोध होऊ शकत होत्या, तिथे जाणीवपूर्वक घोडेबाजार करण्यासाठी एकाच दिवसात तब्बल १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे १५० कोटी रुपये कोणी आणले, कुठून आणले आणि कोणाला वाटले? हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण शिंदे गटाला नीट ठाऊक आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांवर उत्तर देताना राऊत यांनी ओपन चॅलेंज दिले. “तुमच्याकडे आमच्या हजार गोष्टी असतील, तर आमच्याकडेही तुमच्या हजारो गोष्टी आहेत. रोज आरोप-प्रत्यारोपांचे पत्ते पिसत बसण्यापेक्षा तुम्ही समोर बसा, आम्ही समोर बसतो; होऊन जाऊ दे एकदाचं दूध का दूध आणि पाणी का पाणी,” अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले.

केंद्रीय तपास यंत्रणा आणि पोलिसांच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. शिवसेना (UBT) आमदार वैभव नाईक यांच्या पाठीमागे गेल्या ५-६ वर्षांपासून चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. ते मतदारसंघात सक्रिय झाले की लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात चौकशीची नोटीस दिली जाते, हा निव्वळ राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे. अशा नोटिसा फक्त विरोधकांनाच का येतात? सत्ताधारी पक्षात जाऊन ‘धुवून पवित्र’ झालेल्यांना नोटिसा का जात नाहीत? गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी या पक्षपाती कारभारात तातडीने लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी लावलेला हा आरोपांचा धडाका राज्याची राजकीय उष्णता अधिक वाढवणारा ठरला आहे. आता संजय राऊतांच्या या गंभीर आरोपांना आणि ‘ओपन चॅलेंज’ला सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून काय उत्तर मिळते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ