Nagpur News : कामठीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, लाखोंचे नुकसान

spot_img

कामठी (Kamthi) येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात रविवारी सकाळी झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली. या घटनेत अतुल उर्फ बंटी पानतावणे (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास पानतावणे कुटुंब घरात असताना स्वयंपाकघरात गॅस गळती झाली. अतुल यांच्या पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्यानंतर अचानक गळतीमुळे आग लागली. काही क्षणांतच सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण घराला आग लागली. या स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेला, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.

आगीची तीव्रता इतकी होती की काही वेळातच संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आणि सोन्याचे दागिने यांसह सर्व साहित्य आगीत नष्ट झाले. या दुर्घटनेत अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

आग लागल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पत्नी आणि मुले बाहेर पडण्यात यशस्वी झाली, मात्र अतुल पानतावणे हे बेडरूममध्ये अडकले. धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आग विझवण्याच्या प्रयत्नात विनय पानतावणे, नितीन पानतावणे तसेच शेजारी संध्या ढवळे यांच्यासह इतर काही जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

या प्रकरणी घटनेची नोंद जुनी कामठी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष हिवरकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी मृताच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ