थिएटरमध्ये हुकलेली संधी आता मोबाईलवर; शहीद अरुण खेत्रपाल यांची शौर्यगाथा प्राइम व्हिडीओवर दाखल
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपटांची मेजवानी असते, मात्र या आठवड्यात एका अशा चित्रपटाचे आगमन झाले आहे ज्याची प्रेक्षक गेल्या दोन महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते. श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ हा चित्रपट आता ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रवाहित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी सोशल मीडियावर यातील कलाकारांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. विशेषतः एका नवोदित अभिनेत्याची सिनेसृष्टीतील दिग्गजासोबतची अभिनयाची टक्कर पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे.
या चित्रपटाची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीरचक्र विजेते लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या पराक्रमावर आधारित आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीराची भूमिका अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने साकारली आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे भावनिक वैशिष्ट्य म्हणजे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र. त्यांच्या निधनानंतर काही दिवसातच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यामुळे मोठ्या पडद्यावर त्यांना पाहताना अनेक प्रेक्षक भावूक झाले होते. धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतील हा शेवटचा चित्रपट ठरला आहे.
‘इक्कीस’मध्ये अगस्त्य नंदा आणि धर्मेंद्र यांच्यासोबत जयदीप अहलावत, सुहासिनी मुळ्ये आणि अक्षय कुमारची भाची सिमरन भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी पसंती दिली, मात्र जागतिक स्तरावर याने केवळ ३६ कोटींची कमाई केली. अमिताभ बच्चन यांनीही आपल्या लाडक्या नातवाचे कौतुक करताना त्याच्या जन्मापासून ते मोठ्या पडद्यावरील प्रवासापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. चित्रपटगृहात हुकलेला हा ‘मास्टरपीस’ आता ओटीटीवर प्रेक्षकांची मने जिंकणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.




