पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा; पालिकेकडून नागरिकांसाठी कडक ‘SOP’ जाहीर
राज्यात सध्या उन्हाचा तडाखा कमालीचा वाढला असून हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी ‘हीटवेव्ह’चा (उष्णतेची लाट) इशारा दिला आहे. मुंबईचे तापमान ३५ अंशांच्या आसपास स्थिरावले असले तरी वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा असह्य झाला आहे, तर दुसरीकडे विदर्भात पाऱ्याने ४६ अंशांची ओलांडलेली पातळी चिंताजनक ठरत आहे. मुंबईतील मरिन ड्राईव्हसारख्या गजबजलेल्या ठिकाणीही दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत असून, प्रशासनाने नागरिकांना विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मार्गदर्शक सूचना (SOP) जारी केल्या आहेत. यामध्ये लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना उन्हापासून वाचवण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. खिडक्यांना पडदे लावणे, भरपूर पाणी पिणे आणि पाळीव प्राण्यांना बंद वाहनात न सोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नाशिकसह राज्यातील अनेक शहरांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि कोचिंग क्लासेसच्या वेळा बदलण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्यानुसार, आठवड्याअखेरपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य झाले आहे.




