Dia Mirza : ५ वर्षांच्या मुलाचा ‘प्लास्टिक ज्ञान’ देणारा तो किस्सा; दिया मिर्झावर नेटकरी का भडकले?

spot_img

सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये मुलाच्या ‘आत्मविश्वासाचे’ कौतुक; सोशल मीडियावर मात्र “गरिबांशी उद्धटपणा आणि घमेंड” म्हणत नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि पर्यावरणवादी दिया मिर्झा सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणाने नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. नुकतीच तिने अभिनेत्री सोहा अली खानच्या एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीदरम्यान हवामान बदल आणि प्लास्टिक बंदीवर बोलताना दियाने तिच्या ५ वर्षांच्या मुलाचा, अव्यान आझाद रेखीचा एक किस्सा अभिमानाने सांगितला. मात्र, हाच किस्सा नेटकऱ्यांच्या गळ्याखाली उतरलेला नाही आणि त्यांनी दियावर ‘घमंडी’ असल्याचा शिक्का मारत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

“भैया प्लास्टिक घेऊन आले आहेत, आमच्या घरात प्लास्टिक नॉट अलाऊड! तुम्ही प्लास्टिकमधून ते पाणी काढा आणि ती पिशवी-स्ट्रॉ घेऊन जा.” — कमरेवर हात ठेवून अव्यानने डिलिव्हरी बॉयला दिलेला दम.

दियाने पॉडकास्टमध्ये सांगितले की, एकदा तिच्या घरी एक गरीब डिलिव्हरी बॉय नारळपाणी देण्यासाठी आला होता. त्याने ते पाणी एका प्लास्टिकच्या पिशवीत आणि सोबत प्लास्टिकचा स्ट्रॉ ठेवून आणले होते. दियाच्या मते, तिच्या घरात प्लास्टिकच्या वापराला पूर्णपणे मनाई आहे आणि ही गोष्ट पाहून तिचा संताप होतो. त्यावेळी तिचा ५ वर्षांचा मुलगा अव्यान याने दरवाजा उघडला आणि थेट कमरेवर हात ठेवून त्या डिलिव्हरी बॉयला सुनावले.

हा किस्सा ऐकल्यावर सोहा अली खानने मुलाचे कौतुक केले. “इतक्या लहान वयात एका मोठ्या व्यक्तीसमोर इतक्या आत्मविश्वासाने आपली भूमिका मांडणे सोपे नसते,” असे सोहा म्हणाली. परंतु, हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया युजर्सचा पारा चढला.

४० डिग्रीच्या कडक उन्हात, घरोघरी जाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका कष्टकरी डिलिव्हरी बॉयशी अशा भाषेत बोलणे हा ‘आत्मविश्वास’ नसून ‘उद्धटपणा’ आणि ‘अहंकार’ आहे, अशी टीका नेटकरी करत आहेत. एका युजरने संतापून लिहिले, “जर तुम्हाला प्लास्टिक इतकेच नको असेल, तर स्वतः बाहेर जाऊन गाडीवरून किंवा ठेल्यावरून नारळपाणी खरेदी करा आणि ते पेपर बॅगमध्ये घरी आणा. उन्हात काम करणाऱ्या गरीब माणसावर मुलाने रागावणे आणि मोठ्या लोकांनी त्याचे कौतुक करणे चुकीचे आहे.”

काही नेटकऱ्यांनी तर दियाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले आहे. “एकीकडे गरीब माणसाला प्लास्टिकवरून शहाणपण शिकवले जाते, तर दुसरीकडे मुलाची आई स्वतः कॅमेऱ्यासमोर जे महागडे मेकअप प्रॉडक्ट्स लावून बसते, त्याचे पॅकेजिंग प्लास्टिकचेच असते,” असा टोला दुसऱ्या एका युजरने लगावला. मुलाला पर्यावरणासोबतच ‘शिष्टाचार आणि गरिबांचा आदर’ शिकवण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे. या वाढत्या वादावर दिया मिर्झाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ