Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांची साडेपाच तास कसून चौकशी; SIT कडून प्रश्नांची सरबत्ती

spot_img

अशोक खरात यांच्याशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार आणि वादाच्या पार्श्वभूमीवर, आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १ वाजल्यापासून सुरू झालेली ही चौकशी सुमारे साडेपाच तास चालली. खरात यांच्याशी असलेले वैयक्तिक, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध स्पष्ट करण्यावर तपास यंत्रणेने यावेळेस भर दिला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौकशीदरम्यान चाकणकर यांना काही टोकदार प्रश्नांना सामोरे जावे लागले. ज्यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होता:

अशोक खरात यांच्याशी तुमची ओळख नेमकी कधीपासून आहे?

‘शिवणीका’ संस्थेच्या कामकाजात आणि बैठकांमध्ये तुमची भूमिका काय होती?

तुमच्या आणि खरात यांच्यात काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का?

सोशल मीडियावर व्हायरल झालेले खरातसोबतच्या पूजा-विधींचे फोटो आणि व्हिडिओ नेमके कोणत्या हेतूने व कधी काढले गेले?

चौकशीचा फेरा संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडली. त्या म्हणाल्या, “तपास अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समर्पक आणि वस्तुनिष्ठ उत्तरे दिलेली आहेत. माझ्या उत्तरांमुळे तपास पथकाचे समाधान झाले असेल, अशी मला आशा आहे.” पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल का? या प्रश्नावर त्यांनी थेट भाष्य करणे टाळले असले, तरी तपासात पोलिसांना जेव्हा गरज लागेल तेव्हा पूर्ण सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

या प्रकरणातील सविस्तर माहिती आणि विचारलेल्या प्रश्नांचा तपशील एसआयटीच्या अंतिम अहवालानंतरच अधिकृतपणे स्पष्ट होईल. सध्या या चौकशीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या तपासातून पुढे काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ