धान खरेदीचे पैसे अन् बोनस रखडला; बळीराजाच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, सरकारला धारेवर धरले
राज्यातील बळीराजा निसर्ग आणि प्रशासकीय दिरंगाईच्या कात्रीत अडकला असताना, महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज वादळी ठरले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाचे सर्व कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. “शेतकऱ्याला जगवायचे असेल, तर आधी चर्चा करा, मगच सभागृह चालेल,” अशा आक्रमक पवित्र्यात त्यांनी सरकारला कोंडीत पकडले.
“धान खरेदीचे पैसे वेळेत न मिळाल्यामुळे शेतकरी सावकारांच्या उंबरठ्यावर उभा आहे. हाती पैसा नसल्याने पुढील हंगामाची तयारी कशी करायची, हा प्रश्न त्यांना सतावत आहे,” असे वडेट्टीवार यांनी सभागृहात ठणकावून सांगितले. त्यांनी सरकारला इशारा दिला की, केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची हीच खरी वेळ आहे.
एककीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून गदारोळ सुरू असतानाच, दुसरीकडे विधानमंडळातील कामकाजाच्या पारदर्शकतेसाठी ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही समोर आली. याद्वारे आमदारांच्या प्रश्नांचे स्टेटस आणि कामकाजाचे ट्रॅकिंग करणे सोपे होणार आहे.




