२५ वर्षीय प्रज्वलचा टोकाचा निर्णय; थरार सीसीटीव्हीत कैद
“बाबा, मी आंभोरा पुलावरून उडी मारतोय, जीव देतोय मी…” फोनवर मुलाचे हे शब्द ऐकताच वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी जिवाचा आकांत केला, पोलिसांकडे धाव घेतली, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील आंभोरा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर एका २५ वर्षीय तरुणाने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रज्वल सोम ढेंगे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रज्वल मानसिक नैराश्यात (Depression) असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याच मनस्थितीत त्याने आंभोरा येथील प्रसिद्ध पुलावर जाऊन आपल्या वडिलांना शेवटचा फोन केला. वडिलांना आपल्या निर्णयाची कल्पना देऊन त्याने कसलाही विचार न करता वैनगंगेच्या खोल पात्रात उडी घेतली. पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये प्रज्वल पुलावर उभा राहून काही वेळातच नदीत झेप घेताना दिसत आहे. प्रज्वलने उडी मारल्यानंतर पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने तातडीने शोधमोहीम हाती घेतली.
प्रज्वलच्या या टोकाच्या पावलामुळे ढेंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुही परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या त्याच्या मित्रपरिवाराची चौकशी करत असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.




