Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन, महाराष्ट्रावर शोककळा

spot_img

बारामतीजवळ लो व्हिजिबिलिटीमुळे अपघात; पाच जणांचा मृत्यू, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामती येथे सभेसाठी जात असताना बारामती धावपट्टीजवळ कमी दृश्यमानतेमुळे (लो व्हिजिबिलिटी) विमान कोसळले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली आणि सलग स्फोट झाले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मनसे नेते राज ठाकरे, विविध राजकीय पक्षांचे नेते, कुटुंबीय, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्याआधी काटेवाड येथील निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून तेथे मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती सर्वात आधी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांना मिळाल्याचे समोर आले आहे. बारामती विमानतळावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. “विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून केवळ शेवटचा भाग दिसत आहे,” असे त्या कर्मचाऱ्याने सांगितल्याचे राजेश टोपे यांनी भावूक होत सांगितले. अजित पवार यांना भावा प्रमाणे मानत असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. 30 जानेवारी रोजी सर्व शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. शाळांना मात्र केवळ 28 जानेवारी रोजी सुट्टी देण्यात आली असून 29 आणि 30 जानेवारी रोजी शाळा नियमित सुरू राहणार आहेत. इतर शैक्षणिक संस्थांबाबत कोणतेही विशेष आदेश देण्यात आलेले नाहीत. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून लाखो समर्थकांच्या भावना शोकमग्न झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ