spot_img

Sanjay Raut : बदलापूर प्रकरणावरून भाजप अडचणीत; आरोपीच्या नियुक्तीवर संजय राऊतांचा घणाघाती हल्ला

spot_img

लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला नगरसेवकपद, ‘ही सत्ता की संवेदनशून्यता?’ असा सवाल

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, या प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये रोष असून राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत हा निर्णय म्हणजे नैतिकतेची थट्टा असल्याचा आरोप केला आहे. “एका बाजूला महिलांसाठी योजनांची घोषणा करायची आणि दुसऱ्या बाजूला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखालील व्यक्तींना सत्तेच्या खुर्च्या द्यायच्या, हा दुटप्पीपणा नाही का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

राऊत म्हणाले की, बदलापूरमधील या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात तीव्र आंदोलन झाले होते आणि मुख्यमंत्र्यांनाही हस्तक्षेप करावा लागला होता. मात्र, ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या व्यवस्थापनावर आणि संबंधितांवर कारवाई होण्याऐवजी त्यांनाच राजकीय आश्रय दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे. “जे फरार होते, जे जेलमध्ये असतील असे वाटत होते, ते आज थेट नगरपालिकेच्या सभागृहात बसलेले दिसत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

खटला अद्याप न्यायालयात सुरू असताना आरोपीला सन्मानाची जबाबदारी देणे म्हणजे न्यायप्रक्रियेवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही राऊतांनी केला. “काँग्रेस किंवा इतर पक्षांसोबत युती नको म्हणून कारवाईची भाषा करणारे नेते, मग लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपींसोबतची जवळीक कशी काय चालते?” असा सवाल करत त्यांनी भाजपवर महाराष्ट्राच्या संस्कृतीला तडा देत असल्याची घणाघाती टीका केली.

या संपूर्ण प्रकारामुळे भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ‘राजकीय सोयीसाठी नैतिकतेचा बळी’ दिला जातो आहे का, असा गंभीर प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ