लातूरमधील विधानावरून वाद तीव्र; विलासराव देशमुखांच्या स्मृती जनमानसात अढळ असल्याचा रितेशचा भावनिक संदेश
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता “लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील,” असं विधान त्यांनी केल्यानंतर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या वक्तव्यावर आता दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र, अभिनेता रितेश देशमुख यांनी शांत पण प्रभावी शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. रितेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक छोटासा व्हिडीओ शेअर करत दोन वाक्यांत आपली भूमिका मांडली.
“दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, पण कोरलेलं नाही,” असे म्हणत त्याने विलासराव देशमुखांच्या कार्याची आठवण करून दिली. या व्हिडीओला त्याने “महाराष्ट्राच्या मनामनात साहेब” असं कॅप्शन दिलं आहे.
रितेशच्या या प्रतिक्रियेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी विलासराव देशमुख हे लातूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या मनात कायम असल्याचं मत व्यक्त केलं आहे. “कोणी कितीही प्रयत्न केला तरी अशी नावं पुसता येत नाहीत,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.
दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानानंतर कार्यक्रम संपताच माध्यमांशी बोलणं टाळत ते तात्काळ निघून गेले होते. याच मेळाव्यात भाजपचा महापालिका निवडणूक जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला होता.
या वादावर याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया देत, “विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याची ताकद आजवर कोणातच निर्माण झालेली नाही. स्वाभिमानी लातूरकरांनी नेहमीच अशा प्रयत्नांना उत्तर दिलं आहे,” असं ठामपणे सांगितलं होतं. रितेश देशमुखच्या भावनिक पण ठोस प्रतिक्रियेमुळे हा वाद आता अधिकच चर्चेत आला असून, लातूरच्या राजकारणात वातावरण तापण्याची चिन्हं दिसत आहेत.




