spot_img

Mustafizur Rahman : BCCIने घेतला मोठा निर्णय मुस्तफिजूर रहमान IPLमधून बाहेर, KKRला खेळाडू बदलण्याचे दिले आदेश

spot_img

सध्याच्या परिस्थितीचा हवाला देत बोर्डाचा हस्तक्षेप; सोशल मीडियावरील विरोधानंतर कारवाई

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) आयपीएल संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला स्पर्धेतून वगळण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार आयपीएल फ्रँचायजी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ला आपल्या संघातून मुस्तफिजूरला तात्काळ बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

BCCIचे सचिव देबजित सैकिया यांनी शनिवारी, 3 जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. “अलीकडील घडामोडी आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता, केकेआर संघातील बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळण्याचे निर्देश बोर्डाने दिले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल लिलावात केकेआरने मुस्तफिजूर रहमानला तब्बल 9.20 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. मात्र आता बोर्डाच्या आदेशामुळे केकेआरला हा निर्णय बदलावा लागणार आहे. तसेच, मुस्तफिजूरच्या जागी दुसरा खेळाडू घेण्याची परवानगी फ्रँचायजीला दिली जाईल, असेही BCCIने स्पष्ट केले आहे.

मुस्तफिजूरचा केकेआरमध्ये समावेश झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका आणि विरोध पाहायला मिळाला होता. आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडू खेळण्यावरून काही संघटनांनी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर केकेआर आणि त्याचा मालक शाहरुख खान यांनाही सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात आले. काही राजकीय नेत्यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या.

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या आगामी द्विपक्षीय क्रिकेट मालिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र बांगलादेशमधील अस्थिर परिस्थिती लक्षात घेता ही मालिका नियोजित वेळेत होणार की नाही, याबाबत सध्या अनिश्चितता कायम आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ