गर्दीपेक्षा शांतता, निसर्ग आणि संस्कृतीकडे वाढले पर्यटकांचे पाऊल
नैसर्गिक सौंदर्य, विविधता आणि समृद्ध संस्कृतीमुळे भारत जगभरातील पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. 2025 या वर्षातही देशातील अनेक ठिकाणांनी देशी-विदेशी पर्यटकांची मने जिंकली. विशेष म्हणजे, यावर्षी प्रवासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला दिसून आला. धावपळीच्या पर्यटनापेक्षा शांतता, अध्यात्म, सांस्कृतिक वारसा आणि निसर्गसौंदर्याला अधिक महत्त्व देण्यात आले.
काश्मीर
‘भारताचा मुकुट’ म्हणून ओळखला जाणारा काश्मीर 2025 मध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. बर्फाच्छादित पर्वतरांगा, निळेशार तलाव, हिरवीगार दऱ्या आणि आल्हाददायक हवामान यामुळे हिवाळी पर्यटनासाठी काश्मीर पर्यटकांची पहिली पसंती ठरला.
प्रयागराज आणि वाराणसी
आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रयागराज आणि वाराणसी या शहरांनी विशेष लक्ष वेधून घेतले. महाकुंभामुळे प्रयागराजला जागतिक ओळख मिळाली, तर वाराणसीतील गंगा आरती, घाट आणि प्राचीन मंदिरांनी पर्यटकांना भुरळ घातली.
मेघालय
निसर्गप्रेमींसाठी मेघालय 2025 मधील सर्वोच्च डेस्टिनेशन ठरले. ढगांनी वेढलेल्या टेकड्या, खळखळणारे धबधबे, नैसर्गिक पूल आणि स्वच्छ गावांमुळे या राज्याने सोशल मीडियावरही मोठी लोकप्रियता मिळवली.
राजस्थान
राजस्थानी परंपरा, लोककला आणि ऐतिहासिक वास्तूंमुळे राजस्थान यंदा अधिक आकर्षक ठरले. जयपूर आणि उदयपूरमधील सांस्कृतिक कार्यक्रम, मातीचे रिसॉर्ट्स आणि लोकनृत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.
वृंदावन
2025 मध्ये अध्यात्मिक पर्यटनासाठी वृंदावनही चर्चेत राहिले. राधा-कृष्णाच्या भक्तीसाठी ओळखले जाणारे हे शहर कुटुंबीयांसह प्रवास करणाऱ्या भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरले.
एकूणच, 2025 मध्ये भारतीय आणि परदेशी पर्यटकांनी गर्दीच्या ठिकाणांपेक्षा शांत, अर्थपूर्ण आणि संस्कृतीशी नाते जोडणाऱ्या प्रवासाला प्राधान्य दिल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हा बदललेला प्रवासाचा ट्रेंड भविष्यातील पर्यटनाची नवी दिशा ठरवणारा ठरत आहे.




