spot_img

Sanjay Raut : बारामतीतील अदानी दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; संजय राऊतांची थेट प्रतिक्रिया

spot_img

“पवार–अदानी संबंध वैयक्तिक, पण मुंबईवर अदानींचा डोळा मराठी माणसासाठी धोकादायक” – संजय राऊत

राज्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, बारामतीतील एका कार्यक्रमामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आज बारामती दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या संस्थेचे उद्घाटन होत आहे. विशेष बाब म्हणजे या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचे चित्र दिसून आले.

गौतम अदानी यांच्या बारामतीत आगमनावेळी भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी स्वतः गौतम अदानी कार चालवत होते आणि त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध राजकीय नसून ते वैयक्तिक व कौटुंबिक स्वरूपाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या कार्यक्रमाला कोणाला आमंत्रित करायचे, हा पूर्णतः संबंधितांचा व्यक्तिगत निर्णय असतो. त्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित असतील, तरी तो पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.

मात्र, अदानी समूहाच्या मुंबईतील वाढत्या प्रभावावर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या पद्धतीने एका उद्योगपतीला मुंबईत शिरकाव करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, ते मुंबई आणि मराठी अस्मितेसाठी अत्यंत घातक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आमचा विरोध अदानी व्यक्तीला नाही, तर मुंबई ‘गिळण्याच्या’ त्यांच्या धोरणाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीमागे अदानी कुटुंबाचा सहभाग असल्याच्या चर्चा असल्याचे सूचक विधान करत, यामागचे सत्य काय आहे हे संबंधितांनीच सांगावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे बारामतीतील कार्यक्रम केवळ औद्योगिक आणि शैक्षणिक न राहता, राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ