spot_img

Western Railway : कांदिवली–बोरीवली सहाव्या मार्गिकेसाठी मेगा ब्लॉक; २७ डिसेंबरला २७७ लोकल रद्द

spot_img

पश्चिम रेल्वेचे मोठे तांत्रिक काम; लोकल, एक्सप्रेस सेवांवर परिणाम, प्रवाशांसाठी बेस्टच्या जादा बस

कांदिवली–बोरीवली (Kandivali Borivali) रेल्वे विभागातील सहावी मार्गिका पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने तब्बल ३० दिवसांचा विशेष ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक २०/२१ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाला असून १८ जानेवारी २०२६ पर्यंत तो लागू राहणार आहे. या कालावधीत रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

या ब्लॉकदरम्यान शनिवारी, २७ डिसेंबर रोजी सकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत तब्बल २७७ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय २६ आणि २७ डिसेंबरच्या मध्यरात्रीही अनेक लोकल अंशत: रद्द राहतील. काही मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळेत बदल करण्यात येणार असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांवरही त्याचा परिणाम होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, बोरीवली स्थानकातील अप व डाऊन स्लो मार्गावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) पॅनलच्या कमिशनिंगसाठी २६ व २७ डिसेंबर रोजी रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मेजर नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर २६ डिसेंबर रात्री ११ वाजल्यापासून २८ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कांदिवली–दहिसर दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वेगमर्यादा लागू राहणार आहे. त्यामुळे काही लोकल रद्द, तर काही लोकल केवळ गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.

ब्लॉकच्या कालावधीत नंदुरबार–बोरीवली एक्सप्रेस आणि अहमदाबाद एक्सप्रेस या गाड्या बोरीवलीऐवजी वसई येथे शॉर्ट टर्मिनेट आणि ओरिजनेट होतील. बोरीवली–वलसाड मेमू ही ट्रेन डहाणूपासून सुरू होऊन तिथेच समाप्त होईल, तर २८ डिसेंबर रोजी बोरीवली–डहाणू मेमू पूर्णपणे रद्द राहणार आहे. याशिवाय ७ अप आणि १० डाऊन गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार असून १११ अप आणि ३ डाऊन गाड्या नियमनाखाली चालवल्या जातील. तसेच ६ एक्सप्रेस गाड्या बोरीवली स्थानकावर थांबणार नाहीत.

या ब्लॉकमध्ये कांदिवली आणि बोरीवली स्थानक परिसरात ट्रॅक स्लीविंग, क्रॉसओव्हरचे इन्सर्शन व रिमूव्हल, सिग्नलिंग तसेच ओव्हरहेड इक्विपमेंटशी संबंधित महत्त्वाची तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे उपनगरीय, पॅसेंजर आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.

प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने २६ ते ३० डिसेंबर दरम्यान बेस्ट प्रशासनाला बोरीवली–चर्चगेट आणि बोरीवली–विरार मार्गावर अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्याची विनंती केली आहे. गरज भासल्यास जादा बेस्ट बस उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन बेस्ट प्रशासनाने दिले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ