ओतूर,प्रतिनिधी:दि.२५ डिसेंबर ( रमेश तांबे )
ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अस्तित्वात येऊन अनेक वर्षे उलटली असली, तरी आजही मोठ्या प्रमाणावर ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी अपेक्षित जागृती झालेली दिसून येत नाही.फसवणूक झाल्यानंतरही अनेक ग्राहक केवळ माहितीच्या अभावामुळे गप्प बसतात. अशा परिस्थितीत ग्राहकांनी आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रभावी वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जुन्नर व आंबेगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी मा.गोविंद शिंदे यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून जुन्नर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्राहक प्रबोधन कार्यशाळेत’ ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कायद्याचा प्रभावी वापर गरजेचा श्री. शिंदे म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत आपणास ग्राहक म्हणून मिळालेले अधिकार आणि या अधिकाराच्या माध्यमातून आपणावर झालेला अन्याय, फसवणुकीबद्दल दाद मागण्यासाठी प्रभावी वापर करावा.हा केवळ कागदावर राहण्यासाठी नसून तो सामान्य ग्राहकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी साधन आहे. ग्राहकांनी फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे दाद मागितली, तर त्यांना निश्चितच न्याय मिळू शकतो. मात्र, यासाठी ग्राहकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता असणे आवश्यक आहे.
कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची
ग्राहक चळवळ अधिक बळकट करण्यासाठी केवळ कायदे असून चालत नाहीत, तर ते कायदे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारे निस्पृह, सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते आवश्यक आहेत. समाजहितासाठी समर्पित भावनेने काम करणारे नेतृत्वच ग्राहक चळवळ जिवंत ठेवू शकते. ग्रामीण तसेच शहरी भागात आजही ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अज्ञान आहे. ही दरी भरून काढण्यासाठी सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी पुढाकार घेऊन ग्राहक प्रबोधनाचे कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.या कार्यशाळेत बोलताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी म्हणाले की, “राष्ट्रीय ग्राहक दिन वर्षातून एकदाच साजरा करून चालणार नाही, तर ग्राहकाला रोज न्याय मिळाला पाहिजे. ग्राहक हा दयेचा विषय नाही, तर तो लोकशाहीचा कणा आहे. ग्राहक जागा झाला, तर व्यवस्था सरळ होते.” ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा हक्क, म्हणणे मांडण्याचा हक्क तसेच तक्रार करण्याचा व निवारण करून घेण्याचा हक्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेत ग्राहकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, ऑनलाइन फसवणूक, वस्तूंची गुणवत्ता तसेच वजन-मापे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पर्यावरण कॅलेंडरचे प्रकाशन उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, महाराष्ट्र प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी, तहसीलदार डॉ.सुनील शेळके, महाराष्ट्र प्रांत सहकोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यशाळेला जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे,, अ भा ग्राहक पंचायत सहकोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे,निरीक्षक अधिकारी ज्ञानेश कुलकर्णी,पोलीस निरीक्षक किरण अवचर, अन्न भेसळ निरीक्षक संतोष सावंत, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर पगारे ,उपाधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती मंगल गवळी, दुय्यम निबंधक सुचिता सांगळे, कृषी अधिकारी ज्योतीराम जाधव, वनक्षेत्र अधिकारी नितीन विधाटे, ग्राहक पंचायत जुन्नर अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, देवराम तट्टू,महावितरण अधिकारी विजय गारगोटे आदि उपस्थित होते
सन्मान
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने शेतकरी, श्रमिक, उत्पादक, ग्राहक व व्यापारी या पाच घटकांचा प्रातिनिधिक स्वरूपात विशेष कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी, ग्राहक चळवळीतील मान्यवर कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत पुरवठा निरीक्षण अधिकारी ज्ञानेश कुलकर्णी, प्रास्ताविक ज्ञानेश्वर उंडे, सूत्रसंचालन मोहन वलवणकर, तर आभार प्रदर्शन रेशनिंग धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष सुनील गुंजाळ यांनी केले.




