कोल्हापूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत नेत्यांच्या वारसदारांची जोरदार तयारी; सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या संधीवर प्रश्नचिन्ह
आगामी महानगरपालिका निवडणुकांचे संकेत मिळताच राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. विशेषतः कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दिग्गज नेत्यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी आधीच सुरू केली आहे. मात्र या तयारीत निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांच्या मुला-बाळांना आणि निकटवर्तीयांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कोल्हापुरात प्रभाग क्रमांक ३ हा सर्वाधिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक या प्रभागातून निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहेत. महाडिक कुटुंबाची राजकीय पकड लक्षात घेता हा प्रभाग विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्याचवेळी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवार असलेले राजेश लाटकर यांनीही याच प्रभागात रस दाखवला आहे. दोघेही रिंगणात उतरल्यास ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोल्हापूर उत्तरचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर प्रभाग क्रमांक ७ मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तसेच माजी आमदार जयश्री जाधव आणि दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव प्रभाग क्रमांक १८ मधून आपल्या पालकांचा राजकीय वारसा पुढे नेण्याच्या तयारीत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी सर्वच पक्षांनी आपापल्या कुटुंबीयांसाठी सुरक्षित प्रभाग शोधण्यास सुरुवात केली आहे. आमदार संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट आणि मुलगा सिद्धांत शिरसाट हे दोघेही सक्रिय झाले आहेत. आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश जैस्वाल तसेच माजी आमदार किशन तनवाणी यांचे पुत्र चंदू तनवाणी यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे.
याशिवाय माजी महापौर नंदू घोडेले स्वतःसह त्यांच्या पत्नी अनिता घोडेले यांच्यासाठीही निवडणुकीची आखणी करत आहेत. माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड, आमदार संजय केणेकर यांचे पुत्र हर्षवर्धन केणेकर, तसेच बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या पत्नी शीतल कुचे या देखील इच्छुकांच्या यादीत आहेत.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या सचिन खैरे आणि पुत्र ऋषिकेश खैरे हेही निवडणूक रणांगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
या सर्व घडामोडींमुळे येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार की पुन्हा एकदा राजकीय घराणीच वर्चस्व गाजवणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.




