महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखेर शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती अधिकृतपणे जाहीर झाली आहे. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या राजकीय घडामोडीवर शिक्कामोर्तब केलं. जागावाटप आणि उमेदवारांच्या घोषणेबाबत सध्या गुप्तता राखण्यात आली असली, तरी मनोमिलनानंतर आता प्रत्यक्ष मतमिलन झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीकडे बोट दाखवत मराठी समाजाला ठाम शब्दांत आवाहन केलं. “मागील वेळी ‘कटेंगे तो बटेंगे’ असा नरेटिव्ह उभा करण्यात आला होता. आता माझं स्पष्ट सांगणं आहे—चुकाल तर संपाल. फुटाल तर पूर्णपणे संपून जाल,” असा इशारा देत त्यांनी मराठी माणसांना एकजूट राहण्याचं आवाहन केलं. “मराठीचा वसा टाकू नका, तुटू नका, फुटू नका,” असं भावनिक साद त्यांनी घातली.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ देत या युतीचं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केलं. मुंबई महाराष्ट्रात सामील करण्यासाठी १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्या संघर्षाची आठवण त्यांनी करून दिली. ठाकरे कुटुंबाचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून मुंबईच्या हक्कासाठी असलेलं योगदान त्यांनी अधोरेखित केलं.
“आज पुन्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे डाव आखले जात आहेत. ज्यांचे प्रतिनिधी दिल्लीत बसले आहेत, त्यांचे मनसुबे ओळखले पाहिजेत. आपण भांडत राहिलो, तर हुतात्म्यांच्या स्मृतींचा अपमान होईल,” असं सांगत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा राजकीय खात्मा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ घेतल्याचंही त्यांनी जाहीर केलं. दरम्यान, नाशिकसह काही महापालिकांमध्ये युती निश्चित झाली असून उर्वरित महापालिकांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असल्याचं सांगत संजय राऊत म्हणाले, “संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश मराठी ऐक्याचं प्रतीक होता. आज राज आणि उद्धव ठाकरे तोच मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन पुन्हा एकत्र आले आहेत. हा भगवा मुंबईसह अनेक महापालिकांवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात, आणि महाराष्ट्र ठाकरेंच्याच पाठीशी उभा राहील.”




