आचारसंहिता, पैशांचा वापर आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; निवडणूक आयोगावरही सवाल
महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार भूमिका मांडली. तब्येत बरी नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने आपण जनतेसमोर बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे अंगात नवं बळ संचारल्याचंही राऊत म्हणाले.
“ही केवळ निवडणूक नाही, तर मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची शेवटची लढाई आहे,” असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो किंवा कोणत्याही परिस्थितीत असो, मुंबई वाचवण्यासाठी त्याने या संघर्षात सहभागी व्हायलाच हवं, असं आवाहन राऊत यांनी केलं. मुंबईचे अनेक संघर्ष पाहिलेले लोक शांत बसणार नाहीत, असंही ते म्हणाले.
मुंबईत अलीकडे ‘मुंबई वाचवा’ अशा आशयाची पोस्टर्स झळकली होती. या पोस्टर्सवर कोणत्याही पक्षाचं नाव नसतानाही सरकार घाबरलं आणि एका रात्रीत ती काढून टाकली गेली, असा आरोप राऊत यांनी केला. आचारसंहितेचं कारण देत कारवाई करण्यात आली, मात्र ही आचारसंहिता फक्त विरोधकांसाठीच आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांनी आरोप केला की, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटांआधीपर्यंत शासनाकडून आदेश निघत होते, नगरविकास खात्याकडून निर्णय घेतले जात होते आणि विकासाच्या घोषणा सुरू होत्या. मग या सगळ्या घोषणा आचारसंहितेचा भंग ठरत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
निवडणुकीतील खर्चावरही राऊत यांनी तीव्र टीका केली. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या महापालिकांसाठी 15 लाख रुपयांची खर्च मर्यादा आहे. मात्र सत्ताधारी पक्ष खरोखरच या मर्यादेतच निवडणूक लढवेल का, याची खात्री निवडणूक आयोग देऊ शकतो का, असा सवाल त्यांनी केला. नगरसेवक फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारे पक्ष 15 लाखांची मर्यादा पाळतील का, यावरही त्यांनी शंका व्यक्त केली.
“मुंबई मराठी माणसाच्या हातातून काढून घेण्यासाठी पैशांचा मोठा खेळ सुरू होणार आहे. निवडणूक आयोग हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहणार का?” असा थेट प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली.




