खंडाळा तालुक्यातील सुखेड-बोरी गावांमध्ये वर्षानुवर्षे जपली जाणारी अनोखी प्रथा; कथेमागील कारण आजही गावकऱ्यांच्या श्रद्धेचा भाग
आपल्याकडे कोणी दोन शब्द उलट सांगितले की अंगावर तांबडं चढतं आणि आपणही शिव्या घालून संताप शांत करतो. पण सातारा जिल्ह्यात अशी दोन गावं आहेत, जिथे शिव्या देणं ही परंपराच मानली जाते!
खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी या गावांमध्ये नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी महिलांचा एक आगळावेगळा सोहळा रंगतो शिव्या देण्याची प्रथा. अनेक वर्षांपासून येथील महिला एका ठराविक ओढ्यावर जमतात आणि पारंपरिक वाद्यांच्या गडगडाटात एकमेकींना शिव्यांचा वर्षाव करतात. वाद्यांचा आवाज मोठा असतो, जेणेकरून दिलेल्या शिव्या बाहेरच्यांना ऐकू येऊ नयेत.
या प्रथेच्या मागे एक जुनी कथा सांगितली जाते. म्हणे, दोन सुना एका वादातून ओढ्यात पडून मृत्यूमुखी पडल्या. त्यानंतर गावांमध्ये अनेक अघटीत घटना घडू लागल्या आणि गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. शेवटी दोन्ही गावांनी एकत्र येऊन मतभेद मिटवण्यासाठी आणि अशुभ टाळण्यासाठी एकमेकांना शिव्या देण्याची ही अजब परंपरा सुरू केली.
आजही गावातील महिलांचा असा ठाम विश्वास आहे की ही प्रथा पाळली नाही तर गावावर संकटं आणि रोगराई ओढवते. त्यामुळे हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील अनेक ठिकाणांहून लोक मोठ्या संख्येने येतात. मात्र, यावेळी महिला पोलिसांसह गावकऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ होते, एवढं मात्र निश्चित!




