spot_img

Shirdi Trust Provide 11 Lakh For Actor Sudhir Dalvi Treatment : ‘शिर्डी के साईं बाबा’ फेम सुधीर दळवींना शिर्डीच्या संस्थानाकडून11 लाखांच्या मदतीचा हात

spot_img

दीर्घ आजाराशी झुंज देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याच्या उपचारांसाठी कुटुंबाने केलेल्या मदतीच्या आवाहनाला न्यायालयीन मान्यता

‘शिर्डी के साईं बाबा’ या 1977 मधील सुपरहिट चित्रपटातून घराघरात पोहोचलेले दिग्गज अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) सध्या प्रकृतीच्या गंभीर समस्यांशी झुंज देत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू असून त्यांना सेप्सिस झाल्याने मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. या वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक ताण ओढावला असून त्यांनी अलीकडेच मदतीचे आवाहन केले होते.

या आवाहनाला अनेक चाहत्यांसोबतच रिद्धिमा कपूर यांनीही प्रतिसाद देत मदत केली होती. याचदरम्यान श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांनीही पुढाकार घेत न्यायालयाकडे मदत करण्याची परवानगी मागितली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने ट्रस्टच्या मागणीला परवानगी देत सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी 11 लाख रुपये देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं की, साईबाबा संस्थान ट्रस्ट कायद्यात धर्मादाय उपक्रमांसाठी खर्च करण्याची तरतूद असून, लोकांच्या श्रद्धेने जोडलेल्या आणि साईबाबांची प्रभावी भूमिका साकारणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याला मदत करणे योग्य आणि आवश्यक आहे.

सुधीर दळवी यांची पत्नी सांगतात की, ते सध्या अंथरुणाला खिळले असून दोन केअरटेकर आणि एक फिजिओथेरपिस्टच्या मदतीने घरीच त्यांची देखभाल चालू आहे. खर्च प्रचंड असल्याने कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडले आहे. आतापर्यंत उपचारांवर 10 लाख रुपये खर्च झाले असल्याची माहितीही समोर आली आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मधील महर्षी वशिष्ठ, ‘बुनियाद’, ‘भारत एक खोज’, ‘मिर्झा गालिब’, ‘चाणक्य’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण ‘साईं बाबा’ची भूमिका त्यांना अमर करून गेली. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या उपचारांना मोठा दिलासा मिळाला असून कुटुंबाला नव्याने आशा मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ