नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्ला व प्रशिक्षणाचा आरोप; तीन लाख गुंतवणूकदारांकडून उचललेले निधी परत करण्याचे निर्देश
सोशल मीडियावर “शेअर मार्केट गुरु” म्हणून नाव कमावलेले अवधूत साठे यांना सेबीने मोठा धक्का दिला आहे. झटपट नफा मिळवून देणाऱ्या तंत्रांवर आधारित कोर्सेसमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या साठेंना सेबीने थेट शेअर बाजारातील व्यवहारांपासून दूर ठेवण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय, त्यांनी गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले तब्बल 601 कोटी रुपये तातडीने परत द्यावेत, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
अवधूत साठे ट्रेडिंग अॅकॅडमी गेल्या काही वर्षांपासून प्रचंड चर्चेत होती. लाखो लोकांना आकर्षित करणारे कोर्सेस, झटपट कमाईची हमी आणि सोशल मीडियावरील गाजावाजा यामुळे विद्यार्थ्यांची मोठी फळी तयार झाली. परंतु सेबीने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली अवधूत साठे यांच्याकडे गुंतवणूक सल्लागार म्हणून आवश्यक कायदेशीर नोंदणीच नव्हती.
तपासात आणखी उघड झालं की, त्यांच्या कोर्सेसद्वारे विद्यार्थ्यांना विशिष्ट शेअर्स खरेदी-जमा करण्याच्या टिप्स दिल्या जात होत्या. स्टॉक मार्केटबाबत सविस्तर मार्गदर्शन दिलं जात होतं. अनेक विद्यार्थ्यांकडून बाजारात गुंतवण्यासाठी पैसेही गोळा केले जात होते एकूण 3 लाख गुंतवणूकदारांकडून 601 कोटींची उभारणी झाल्याचं सेबीच्या 125 पानी आदेशपत्रात नमूद आहे. यावरून सेबीने साठे यांच्यावर कठोर कारवाई करत पुढील आदेश येईपर्यंत त्यांना सिक्युरिटीज मार्केटपासून दूर ठेवले आहे. तसेच, त्यांनी स्वतःची किंवा विद्यार्थ्यांची कामगिरी जाहिरातीत वापरण्यासही बंदी घातली आहे.
मुंबई, दिल्ली, चंदीगढ, कोलकाता, भुवनेश्वर, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद अशा अनेक शहरांत अवधूत साठेची अकॅडमी वर्ग चालवत होती. सोशल मीडियावर गाजलेले हे वर्ग आता तपासाच्या जाळ्यात अडकले असून गुंतवणूकदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.




