बाळाशी संवाद, त्याच्या हालचालींवर लक्ष आणि शरीरस्वातंत्र्याची सुरुवातीपासून शिकवण आधुनिक पालकत्वाचा बदलता चेहरा
बाळ जन्माला आल्यानंतर घरातली पहिली सवय म्हणजे डायपर. स्वच्छता, सोय आणि आराम या तिन्ही कारणांसाठी पालक नियमितपणे डायपर बदलत असतात. पण आता या अगदी नेहमीच्या प्रक्रियेबद्दल जगभरात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. आधुनिक पालकत्वात असा विचार पुढे येतो आहे की, डायपर बदलण्याआधी बाळाला शब्दशः ‘परवानगी’ विचारावी.
जरी बाळ बोलू शकत नसले तरी त्याच्याशी बोलणं, त्याला आधी कळवणं आणि त्याच्या प्रतिक्रियेचा आदर करणं ही या संकल्पनेची मुळ कल्पना आहे. उद्देश एकच, बाळाला लहानपणापासून स्वतःच्या शरीराची जाणीव आणि स्वामित्वाची भावना देणे.
पालक जेव्हा डायपर बदलण्यापूर्वी शांतपणे बाळाशी बोलतात, तेव्हा त्यांच्यातील विश्वासाची नवी बांधणी होते. अचानक कुणीतरी हाताळण्याऐवजी आधी सांगितलं जातंय — ही सुरक्षिततेची भावना बाळासाठी महत्त्वाची मानली जाते. पुढे मुलांना ‘नाही’ म्हणण्याचं धाडस, किंवा स्वतःबद्दल खुलेपणाने बोलण्याची ताकद यामुळेच टिकू शकते, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
डायपर बदलणे ही गोष्ट रोजची असली, तरी ती अत्यंत वैयक्तिक असते. या वेळी बाळाशी हसतखेळत संवाद साधणे, “मी तुझा डायपर बदलणार आहे” किंवा “आता स्वच्छ करूया” असं सांगून क्षणभर बाळाची हालचाल पाहणे — यातून त्यांना आदर दिला जातोय, अशी भावना निर्माण होते.
प्रक्रियेत बाळालाही सामील करण्याचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ, “पाय वर करशील का?” अशा छोट्या विनंतीतूनही बाळाला आपलं मत आणि उपस्थिती महत्त्वाची वाटते.
या पद्धतीचे अनेक सकारात्मक परिणाम दिसू शकतात
- सुरक्षिततेची भावना वाढते
- बाळाला स्वतःच्या भावनांची किंमत कळते
- आत्मविश्वास वाढतो
- पालक–बाळ नातं अधिक घट्ट होतं
म्हणूनच, डायपर बदलणे ही फक्त स्वच्छतेची दिनचर्या नसून, बाळाच्या मानसिक व भावनिक विकासालादेखील आकार देणारी प्रक्रिया ठरू शकते, असा नवा विचार आता जगभर चर्चेत आहे.




