नागपूर खंडपीठाचा निर्णय चुकीचा, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप असंविधानिक – आंबेडकर
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशांमुळे हा निकाल आता 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे 20 डिसेंबरपर्यंत आचारसंहिताही लागूच राहणार आहे. या घडामोडीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “नगरपरिषद निवडणुकांच्या निकालाबाबत खंडपीठाने दिलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. संविधानानुसार सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेत कोणतेही न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टानेही यासंदर्भात हस्तक्षेप नाकारला होता, तरीही नागपूर खंडपीठाने असा आदेश कसा दिला?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, फक्त निवडणूक चिन्हवाटपासारख्या मर्यादित मुद्द्यांवर खालच्या न्यायालयांना अधिकार आहे. उच्च न्यायालयाला निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 10 डिसेंबरपर्यंत नव्या नगरसेवकांची गॅझेट नोटीस प्रसिद्ध व्हायला हवी होती. मात्र आयोगानेच स्वतःचा कार्यक्रम बदलल्याने निवडणूक प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे, असे आंबेडकर म्हणाले.
त्यांनी पुढे म्हटलं की, “या निर्णयामुळे घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे निवडणूक प्रक्रिया वारंवार अडखळतेय. सरन्यायाधीशांनी हे प्रकरण ताब्यात घेऊन थांबवलेली मतमोजणी लगेच सुरू करण्याचे आदेश द्यावेत.” तसेच त्यांनी राजकीय पक्षांना आवाहन केले की, “न्याय मिळवण्यासाठी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी घाबरू नका. 21 तारखेची मतमोजणी काही अर्थाची राहिलेली नाही. निवडणूक आयोगानेच कोर्टात जाऊन योग्य निर्णय मिळवावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.




