spot_img

Sheetal Tejwani : मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहारात शीतल तेजवाणीला अटक; पोलिसांच्या कारवाईमागे राजकीय वेगाचा प्रश्न?

spot_img

बनावट कागदपत्रांच्या आधारे ४० एकर सरकारी जमिनीचे हस्तांतरण; अमेडिया कंपनी आणि संबंधित राजकीय नावांवर संशयाची सुई

पुण्यातील मुंढवा परिसरातील कोट्यवधींच्या शासकीय जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या शीतल तेजवाणीला (Sheetal Tejwani) अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दोन वेळा चौकशी केल्यानंतर ३ डिसेंबर रोजी झालेली ही कारवाई आता चर्चेचा विषय ठरली आहे. आज तिला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या अटकेनंतर या हाय-प्रोफाइल प्रकरणाच्या तपासाला वेग मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात तेजवाणीवर सुमारे ४० एकर महार वतन शासकीय जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून अवैधपणे हस्तांतरण, तसेच मुद्रांक शुल्कात शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. ही जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित अमेडिया एन्टरप्रायझेस या कंपनीने खरेदी केली होती.

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी मात्र या अटकेच्या वेळेबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले आहे. विधानसभा अधिवेशन अगदी दारात असताना ही कारवाई केवळ राजकीय दबाव टाळण्यासाठी झाली का, असा संशय त्यांनी व्यक्त केला. तेजवाणीवर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल असून, या प्रकरणातही समितीची मुदत ६ डिसेंबरला संपणार असताना अचानक झालेली अटक ‘घाईची’ वाटत असल्याचे ते म्हणाले.

कुंभार यांचा आरोप असा की, फक्त तेजवाणीला अटक केल्याने काही बदलणार नाही; तपास पार्थ पवार आणि अमेडिया कंपनीच्या संचालकांपर्यंत पोहोचला, तरच कारवाईला गांभीर्य मिळेल. अन्यथा ही केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक ठरेल.

या जमिनीचे मूळ बाजारमूल्य जवळपास १८०० कोटी रुपये असताना, ती केवळ ३०० कोटींना विकण्यात आली, असा आरोपही आहे. तेजवाणीने २७२ वतनदारांकडून बनावट कुलमुखत्यारपत्रे घेऊन शासनाच्या आदेशाविना जमीन हस्तांतरित केली, अशी माहिती समोर आली आहे. या घोटाळ्यात अमेडिया कंपनीचा भागीदार दिग्विजय पाटील आणि निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) पोलिसांकडे तेजवाणीविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंद आहेत. आता न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढील तपासातून या प्रकरणातील राजकीय दुवे कितपत उलगडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ