निवडणूक आयोगाच्या निर्णयावर फडणवीसांची टीका; कार्यकर्त्यांची मेहनत वाया गेल्याची खंत
राज्यात काही स्थानिक निवडणुका मतदानाच्या आदल्या दिवशीच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने निर्माण झालेल्या गोंधळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाराजी व्यक्त केली. “सत्तेत कोण आहे किंवा कोण विरोधात आहे, यावरून कारवाई ठरत नाही. तक्रार आली की तपास होतोच; माझीही गाडी अनेकदा तपासली गेलीय,” असे सांगत त्यांनी कायदा सर्वांसाठी समान असल्याचे स्पष्ट केले.
अचानक रद्द झालेल्या निवडणुकांमुळे कार्यकर्ते निराश झाल्याबद्दल विचारल्यावर फडणवीस म्हणाले, “निवडणूक आयोगाने कायद्याचा स्पष्टपणे चुकीचा अर्थ काढलाय. कोणी कोर्टात गेले म्हणून निवडणूक पुढे ढकलण्याची परंपरा कधीच नव्हती. हा निर्णय पूर्णपणे अयोग्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी अनेक वकिलांशी चर्चा केली. कायद्यात कुठेही असा प्रावधान नाही की एका व्यक्तीच्या अर्जावर कोर्टात चर्चा सुरु असल्याने संपूर्ण निवडणूक पुढे ढकलावी.”निलंगा मतदारसंघाचे उदाहरण देत फडणवीस म्हणाले की, “एक उमेदवार कोर्टात गेला, कोर्टाने त्याचा फॉर्मच नाकारला, पण निवडणूक प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला नाही. मग आता अचानक निर्णय का? कोणीतरी पार्टी केली म्हणून निवडणूक रद्द करणे हास्यास्पद आहे.”
ते म्हणाले, “निवडणूक आयोग स्वतंत्र आहे, त्यांच्या अधिकारात निवडणुका घेणे येतं. पण कायदेशीरदृष्ट्या हा निर्णय चुकीचा आहे. कष्टाने प्रचार केलेल्या उमेदवारांसाठी हे अन्यायकारक आहे. आम्ही आयोगाला याबाबत प्रतिनिधित्व देणार आहोत.” भाजपाच्या सर्वेक्षणात 75 नगराध्यक्ष जिंकू असा दावा असल्याचे विचारल्यावर फडणवीस हसत म्हणाले, “असा काही सर्वे झालाय याची मला माहिती नाही. पण भाजप हा नंबर 1 पक्ष आहे, आणि मित्रपक्ष त्यामागोमाग असतील.”




