मालवणमध्ये वेगळाच राजकीय ड्रामा रंगला आहे.
शिवसेना (शिंदे गट) चे आमदार निलेश राणे यांनी थेट मालवणमधील (Malvan) भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरी पोहोचत स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा केला. या धाडी दरम्यान, घरात एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत अंदाजे २५ लाखांची बेहिशोबी रोख रक्कम आढळल्याचे त्यांनी सांगितले.
निलेश राणेंचा (Nilesh Rane) आरोप असा की, काही दिवसांपासून मालवणमध्ये निवडणुकीपूर्वी पैसे वाटपाचं जाळं उभारलं जात आहे. यात रवींद्र चव्हाण यांच्या भेटीचा संबंध असल्याचं ते सूचित करत आहेत. “ते काल जिल्ह्यात आले आणि लगेचच पैशांची हालचाल सुरू झाली,” असा इशारा त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, पैशांच्या बॅगा पोहोचवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली असून भाजपच्या काही कार्यकर्त्यांची नावेही त्यांनी घेतली.
या आरोपांचा प्रतिउत्तर देताना भाजपचे मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी खास जोरदार भूमिका घेतली. “रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं जिल्ह्यांमध्ये जाणं स्वाभाविक आहे. त्याला राजकीय रंग देऊ नये,” असे ते म्हणाले. तसेच स्वतःच्या व्यवसायासाठी घरी पैसे असणं चुकीचं नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. नितेश राणे पुढे म्हणाले, “आमच्यावर आरोप करून पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय. नियम आमच्यासाठी जसे, तसेच सगळ्यांसाठी. ‘हमाम में सब नंगे’ ही वस्तुस्थिती आहे.”
युतीबाबतही निलेश राणेंनी केलेल्या टीकेवर नितेश राणेंनी उत्तर देत सांगितले की, युती ठरण्याची प्रक्रिया निश्चित असते, आणि आता त्या चर्चेची वेळ निघून गेली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कोकणात राणे बंधू – निलेश आणि नितेश यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.




