आरोपी पती-पत्नीला ओतूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.
खेळण्या-बागडण्याच्या वयात कधी आपल्या नातलगांकडून, परिचित-अपरिचित व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचाराला बालकांना सामोरे जावे लागते. बालकांवर होणाऱ्या अत्याचारापासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) तयार करण्यात आला आहे. मात्र या कायद्याचा बऱ्याच ठिकाणी गैरवापर केला जात आहे. पुण्याच्या (Pune) जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथे राहणाऱ्या मारूती मनोहर कदम (वय 61वर्षे) यांच्यासोबत असंच घडलय. एवढंच नाही तर मनोहर कदम यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. मनोहर कदम यांनी आरोपी पती पत्नीची पोलिसात तक्रार दाखल केली. पॉक्सो व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दीड कोटीची खंडणी मागणाऱ्या आरोपीस ओतूर पोलीसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे म्हणाले की, सदरच्या तक्रारीनुसार आरोपींनी अल्पवयीन मुलीचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व मनोहर कदम यांच्याकडून दीड कोटी रूपयांचे प्रत्येकी पन्नास लाख रूपयांचे तीन चेक घेतले. त्यानंतर बाकी असलेल्या पन्नास लाख रूपयांची फिर्यादीकडून वारंवार मागणी केली गेली. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पती-पत्नी यांनी सत्र न्यायालय जुन्नर या ठिकाणी अटकपूर्व जामिन मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पती-पत्नीने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयाने सदरच्या अर्जावर 20 वेळा सुनावणी केली. तरी देखील सदर आरोपीचा अटकपूर्व जामिन मंजूर न झाल्याने आरोपीने दि. 24 नोव्हेंबर रोजी ओतूर पोलीस स्टेशन येथे आत्मसमर्पन केल्याने त्यास सदरच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले. न्यायालयाने विजय हरिदास फलके यास 7 दिवसांची पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. आरोपी विजय हरिदास फलके याने अशाच प्रकारचे गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत का ? याबाबत तपास सुरू आहे.




