माझ्यावर टीका करू नका, मेरी डिकॉस्टाचे आवाहन.
स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) हे दोघेही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. सांगलीत 23 नोव्हेंबर रोजी त्यांचे मोठ्या धामधुमीत लग्न होणार होते. परंतु स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आले. याच काळात पलाश मुच्छलच्या एका मुलीसोबतच्या चॅटिंगचे कथित स्क्रीनशॉट समोर आले होते. त्यानंतर पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला. तिला अंधारात ठेवले, अशा भावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या. असे असतानाच आता पलाश कथितपणे ज्या मुलीशी बोलत होता, त्याच मुलीने समोर येत सर्व प्रकार सांगितला आहे. तिने मी चुकीची नाही. माझ्यावर टीका करू नये, असेही म्हटले आहे. सोबतच तिने अनेक नवे खळबळजनक खुलासे केले आहेत.
मेरी डिकॉस्टाने शेअर केलेले स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. “पलाशसोबतची चॅटिंग मीच पोस्ट केली आहे. माझे नाव समोर येऊ नये अशी माझी इच्छा आहे. आमच्यात ही चॅटिंग मे-जुलै 2025 मध्ये झालेली आहे. आमच्यात फक्त एक महिना बोलणं झालं. माझं त्याच्यासोबत कोणतंही नातं नव्हतं. मी स्मृती मानधनाचा खूप आदर करते. लोकांना हे सगळं कळायला हवं म्हणूनच मी चॅटिंगचे स्क्रीनशॉट सगळीकडे पोस्ट केले. मी एक कोरिओग्राफर नाही,” असे तिने सांगितले आहे. सोबतच लोक माझ्यावरच टीका करतील असे मला वाटले नव्हते. माझी यात काहीही चूक नाही. मीच पलाश मुच्छलकडे दुर्लक्ष केलं. कृपया माझ्यावर टीका करू नका. लोक मला समजून घेतील असे मला वाटले होते. माझी यात काहीही चूक नाही. मी कधीच कोणत्याही महिलेसोबत वाईट वागणार नाही, असेही मेरी डिकॉस्टाने स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, मेरी डिकॉस्टाच्या या स्पष्टीकरणानंतर आता पुन्हा एकदा पलाश मुच्छल चर्चेत आला आहे. या प्रकरणी आता पलाश नेमकी काय प्रतिक्रिया देणार, सोबतच स्मृती मानधना नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




