रुग्णालय म्हणजे रुग्णांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण… पण उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने थेट साप हातात घेऊनच ठाणे सिव्हिलमध्ये प्रवेश केला आणि काही क्षणातच सुरक्षिततेची सगळी समीकरणं उलटी-पुलटी झाली!
ठाणे व पालघरच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येणाऱ्या ठाणे सिव्हिलमध्ये सोमवारी अचानक खळबळ उडाली. सर्पदंश झालेला ओंकार राठोड हा तरुण हातातच धामण साप घेऊन रुग्णालयात दाखल झाला. त्याच्या हातातील जिवंत साप पाहताच डॉक्टर, नर्स आणि रुग्णांची एकच पळापळ सुरू झाली.
यात भर म्हणजे तपासणीदरम्यान साप अचानक त्याच्या हातातून निसटला आणि थेट एका कपाटाखाली शिरला. काही क्षण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर स्वतः सर्पदंश झालेल्या त्या तरुणाने धाडस दाखवत साप पुन्हा पकडला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या प्रकारात कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. दरम्यान, साप हातात घेतलेलाच रुग्ण उपचार न घेता तिथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. नूतनीकरणाच्या कामामुळे सध्या तात्पुरत्या इमारतीत चालणाऱ्या सिव्हिल रुग्णालयातील सुरक्षेबाबत मात्र या घटनेनंतर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.




