एमएमआरसीएलकडून तातडीने दुरुस्ती कार्य सुरू प्रवाशांना सुरक्षित काढलं बाहेर
मुंबईतील पहिलीच मोठी भुयारी मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-३ सेवेला आज सकाळी अनपेक्षित अडथळा निर्माण झाला. कफ परेड स्थानक परिसरात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ॲक्वा लाईनवरील एक मेट्रो अर्ध्यावरच थांबली. सकाळी अंदाजे १०.३० च्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ प्रवासी भुयारातच अडकून पडले.
या प्रसंगात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही, मात्र गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाल्याने ऑफिसला जाणारे तसेच इतर प्रवासी अडचणीत सापडले. बिघाडाची माहिती मिळताच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याची आणि बिघाडग्रस्त गाडीची तपासणी करण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
आरे ते कफ परेड असा भुयारी मार्ग व्यापणारी ही महत्वाकांक्षी मेट्रो सेवा काही महिन्यांपूर्वीच प्रवाशांसाठी खुली करण्यात आली होती. आज झालेल्या या अनपेक्षित अडथळ्यामुळे अनेकांना प्रवासात विलंब सहन करावा लागला असून, या गैरसोयीबद्दल एमएमआरसीएलने दिलगिरी व्यक्त केली आहे. नेमका तांत्रिक दोष काय होता याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.




