करवीरपीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते विधीपूर्ण घटस्थापना.
अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर शुक्रवारपासून चंपाष्टमी म्हणजेच चंपाषष्ठीच्या षड्रात्र उत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. चंपाषष्ठी हा उत्सव खंडोबा भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. लोकश्रद्धेनुसार या कालावधीत खंडोबानं मणी-मल्ल या दैत्यांचा वध करून लोक कल्याण केलं. मनी मल्लाच्या त्रासातून लोकांची मुक्तता केली. या विजयाची स्मृती म्हणून हा सोहळा साजरा केला जातो. याच श्रद्धेनं दरवर्षी लाखो भाविक जेजुरी गडावर येत असतात. चंपाषष्ठीनिमित्त जेजुरी गडावर सहा दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.

काल 21 नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून श्री खंडोबा (Shri Khandoba) देवाचा श्री मार्तंड भैरव षडरात्रौत्सव साजरा केला गेला. मुख्य गाभाऱ्यातील स्वच्छता पाखळणी उरखल्यानंतर मुख्य उत्सव मूर्ती बालद्वारीमध्ये स्थापना करण्याकरिता नेण्यात आल्या. पुजारी सेवेकरी वर्गाकडून सालाबादप्रमाणे घटस्थापना श्री नृसिंह भारती शंकराचार्य (करवीर पीठ कोल्हापूर) यांच्या शुभहस्ते 12 वाजता करण्यात आले. यावेळी पुजारी सेवेकरी वर्ग, श्रीमार्तंड देव संस्थान विश्वस्त प्रमुख मंगेश घोणे, वेदमूर्ती पुरोहित शशिकांत सेवेकरी काका, मंगेश खाडे गुरुजी यांच्या मंत्रोच्चाराच्या व सनई चौघडा वादनामध्ये विधिवत पूजा अभिषेक उत्सव मूर्ती घटस्थापनेच्या ठिकाणी बसविण्यात आल्या.




