राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला.
राज्यात सगळीकडे निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच आता मनसेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते. मात्र त्यांनी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पिट्या भाईसोबतच पुण्यातील (Pune) मनसेच्या पदाधिकाऱ्यांन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडल्याचं दिसतंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची 6 नोव्हेंबर रोजी पुण्यातील शाखाध्यक्षांच्या सोबत एक बैठक घेतली होती. यावेळी मराठी चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी यांच्यावर राज ठाकरे संतापले अशी चर्चा या बैठकीनंतर झाली. यावर रमेश परदेशी यांनी खुलासा केला होता की माझ्यावर राज साहेब चिडले नाहीत फक्त मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला त्यावरून मला ठाकरे शैलीत त्यांनी मिश्किलपणे बोलले. मात्र यानंतर पुन्हा एकदा अभिनेता रमेश परदेशी यांनी फेसबुक वरती एक फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
या पक्षप्रवेशाबाबत बोलताना रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) म्हणाले की, “मी भारतीय संघाचा स्वयंसेवक आहे. माननीय राज ठाकरे साहेब यांच्यासोबत मी गेले वीस वर्षे काम करत आहे. बदललेली परिस्थिती कलाकारांना आणि मराठी सिनेमांना न्याय देण्यासाठी आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मला खुणावत होते म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करत आहे.”




